नागपूर - उपराजधानी नागपुरसह संपूर्ण विदर्भात कोरोना बधित मृत्यूंचे आकडे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. गेल्या २४ तासात उपराजधानी नागपूर शहरात आणि जिल्ह्यात तब्बल ९८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मृत्यूचे आकडे हे शंभरीच्या जवळच स्थिरावत असल्याने चिंता वाढली आहे.
मागील २४ तासात नागपूर शहरात आणि जिल्ह्यात तब्बल ७ हजार २२९ रुग्णांना कोरोनाची लागण झालेली आहे. यामध्ये ४ हजार ७८७ रुग्ण शहरातील आहेत तर २ हजार ४३४ रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. उर्वरित ८ रुग्ण हे बाहेरील आहेत. आज (बुधवारी) ६ हजार ३६४ रुग्णांची भर पडल्यामुळे एकूण सक्रिय रुग्णाची संख्या ७१ हजार ५५७ इतकी झाली आहे. आज (बुधवारी) जिल्ह्यात २४ हजार १६३ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. ज्यामध्ये १५ हजार ३५६ आरटीपीसीआर आणि ८ हजार ८०७ अँटीजन चाचण्यांचा समावेश आहे. नागपूर शहरात आणि जिल्ह्यात तब्बल ९८ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ५२ रुग्ण शहरी भागातील तर ३८ रुग्ण नागपूरच्या १४ तालुक्यातील आहेत. नागपूर मध्ये एकूण मृतकांचा आकडा ६ हजार ५७५ इतका झाला आहे.