नागपूर:मुंबईसह राज्यातील इतर वन क्षेत्रांच्या लगतच्या शहरांमध्ये अलिकडच्या काळात वाघांचे हल्ले वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांना सतत दहशतीच्या छायेत वावरावे लागत आहे. गेल्या काही वर्षात वाघांची संख्या वाढत आहे. २०१४ मध्ये राज्यात १९० वाघ होते. आता ती संख्या ५०० पार झाली आहे. यामधील ९७ टक्के वाघ विदर्भातील आहेत, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.
वन्य जीव आणि मानव वाढता संघर्ष:वन्य जीव आणि मानवी संघर्ष हा सतत वाढतो आहे. गेल्या तीन वर्षात यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तर गेल्या पंधरा वर्षात प्रत्येक वर्षी किमान ४५ ते ५० लोकांचा वन्य जीवांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. परंतु २०२१-२२ मध्ये ही संख्या ८० पेक्षा अधिक झाली आहे. अलीकडे चंद्रपूरमध्ये जीवघेणा हल्ला केलेल्या एका वाघाला पकडण्यात वन विभागाला यश (Forest Department) आले आहे. तर दुसऱ्या वाघाला वन्य कर्मचाऱ्यांनी ओळखले आहे. भविष्यात राज्यातील वाघांची संख्या वाढणार, ही आंनददायक बाब आहे. परंतु, तितकीच चिंताजनक सुद्धा असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
वाघ स्थलांतरित करण्याचा पर्याय:वाघांचे मानवी वस्तीत वाढते हल्ले रोखण्यासाठी महाराष्ट्रातील वाघ इतर राज्यांमध्ये स्थलांतर करण्याचा वनविभागाचा विचार आहे. शेजारच्या राज्यांना त्यांच्या प्राणी संग्रहालयासाठी वाघ हवे असल्यास ती देण्याची राज्य सरकारने (State Government) तयारी दर्शवली आहे. काही राज्यांना याबाबत पत्र लिहिले असून, आतापर्यंत बिहारने याला प्रतिसाद दिला आहे. आम्ही सर्वप्रथम चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ स्थलांतरित करण्याला प्राधान्य दिले असल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.
जंगलात गेलेल्या व्यक्तींवर हल्ले अधिक:आतापर्यंतच्या ८० घटनांमध्ये व्यक्ती जंगलात गेल्यामुळे त्याच्यावर वाघाने हल्ला केला आहे. तर २० टक्के प्रमाणात वाघ मानवी वस्तीमध्ये शिरून हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्यात ११५ वाघ असून यावर्षी चंद्रपुरात ४९ लोकांचा वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झाला असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. तर वाघांच्या हल्ल्यात आतापर्यंत २०१७-१८ मध्ये ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. २०१९-२० मध्ये ४७,२०२०-२१ मध्ये ८० तर २०२१-२२ मध्ये ८६ लोकांचा हल्ल्यामध्ये मृत्यू झाला असल्याची माहितीही या अधिकाऱ्याने दिली.