नागपूर - शेतात कापूस वेचताना वीज पडून तीन महिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी जवळ असलेल्या शिवा-सावंगा शिवारात ही घटना घडली. तर दोन महिलांवर उपचार सुरू आहे.
शेतात कापूस वेचताना वीज पडून तीन महिलांचा मृत्यू तर दोघी जखमी; नागपूर जिल्ह्यातील घटना - नागपूर बातमी
शेतात वीज पडून तीन महिलांचा मृत्यू झाला तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या. नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी शिवारात ही दुर्दैवी घटना घडली. जखमींवर वानाडोंगरी येथील लता मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतात कापूस वेचत असताना ही दुर्दैवी घटना घडली. शिवा-सावंगा येथील शेतकरी श्रावण इंगले यांच्या शेतात पाच महिला कापूस वेचत होत्या. रविवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमासास वीज पडली. यामध्ये अर्चना उमेश तातोडे (वय ३५), शारदा दिलीप उईके (वय ३६) आणि संगीता गजानन मुंगभाते (वय ३५) या तीन महिलांचा मृत्यू झाला. तर पंचफुला गजानन आसोले आणि सत्यभामा श्रावण इंगले या गंभीर जखमी झाल्या. काम करणाऱ्या पाचही महिला शिवा-सावंगा गावातील रहिवाशी आहेत. घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी सर्वांना तातडीने वानडोंगरी येथील लता मंगेशकर रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तीन महिलांना मृत घोषित केले. तर दोन महिलांवर उपचार सुरू आहे.