नागपूर -जिल्ह्यात मध्यंतरी पाच दिवस सातत्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण रुग्णसंख्या वाढून दोन आकडी झाली होती. त्यामुळे निर्बंध लावण्याचे संकेत पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले होते. पण ही संख्या पुन्हा घटल्याने बाप्पाच्या आगमनासह निर्बंधांचे संकट तूर्तास टळले आहे. त्यामुळे नागपूरकर आणि व्यापारी यांना दिलासा मिळाला आहे.
व्यापारी वर्गात पुन्हा भीतीचे वातावरण -
सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला पाच दिवस कोरोनाचे रुग्ण वाढले होते. यामुळे रुग्णसंख्या जर दोन आकडी जाणार असेल आणि सणासुदीचा काळ लक्षात घेऊन निर्बंध लावावे लागतील, असे स्पष्ट संकेत पालकमंत्री नितीन राऊत यांनी विभागीय कार्यालयातील बैठकीनंतर दिले होते. शिवाय तीन दिवसांत निर्बंध लावले जाईल, असेही सांगितले होते. यामुळे व्यापारी वर्गात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, गणेश चतुर्थीच्या दिवशी पालकमंत्री नितीन राऊत यांनी व्हिडीओमधून नागरिकांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच नागरिकांनी कोरोना नियमाचे पालन करावे, असे म्हटले होते. तसेच मुख्यमंत्री कार्यालयाला वेळोवेळी नागपूरच्या परिस्थितीची माहिती दिली जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.