नागपूर : मराठी भाषेच्या इतिहास प्रदर्शनात मराठी माणसांना मिळवलेले सर्वश्रेष्ठ पुरस्कार यामध्ये ज्ञानपीठ,भारतरत्न सारखे पुरस्कार प्राप्त महानुभावांचे फोटो लावण्यात आले आहेत. मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने राज्य मराठी विकास संस्थेची स्थापना केली.
राज्य मराठी विकास संस्थेची स्थापना :१ मे, १९९३ पासून संस्थेच्या कामकाजास प्रत्यक्ष सुरुवात झाली. विविध क्षेत्रात मराठीचा होणारा वापर अधिकाधिक गुणवत्तापूर्ण होत जावा. मराठी भाषेच्या अधिवृध्दीची प्रक्रिया नियोजनपूर्वक गतिमान करण्यासाठी भाषा, संस्कृतीच्या क्षेत्रात मराठी भाषेच्या अभिवृध्दीसाठी काम करणाऱ्या विविध शासकीय, अशासकीय संस्थांमध्ये समन्वय राखून त्या संस्थांच्या सहाय्याने काही उपक्रम संस्था पार पाडते. त्याच अनुषंगाने मराठी भाषा विभागाकडून 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे प्रदर्शनी दालन सुरू करण्यात आले आहे.
मराठी विभागाची पोस्टकार्ड मोहीम :मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याकरिता मराठी भाषा विभागच्या राज्य मराठी विकास संस्थेकडून 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एक विशेष दालन सुरू करण्यात आले आहे. यामध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याकरिता लाखो पत्र महामहिम राष्ट्रपतींना पाठवले जात आहेत. साहित्य संमेलनात आलेले मराठी भाषा प्रेमी आवर्जून या दलनाला भेट देत आहेत. केंद्र सरकारने आजवर तमिळ, संस्कृत, तेलगु, कन्नड व मल्याळम या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. या दर्जामुळे त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून भरीव अनुदान मिळते. भाषेची प्रतिष्ठा वाढते. भाषेच्या श्रेष्ठतेवर राजमान्यतेची मोहोर उमटते. भाषेच्या विकास कार्यास अधिक चालना मिळते. मराठीलाही हा दर्जा मिळावा अशी तमाम मराठी भाषकांची इच्छा आहे.