नागपूरसह विदर्भात वाढला उकाडा; सर्वच जिल्ह्यांचे तापमान ४० अंशाच्या उंबरठ्यावर - विदर्भाचे तापमान वाढले
विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून तापमानात वाढ नोंदवण्यात येत आहे. त्यामुळे काही जिल्ह्यातील दिवसाचे तापमान आता ४० अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे.
नागपूर - नुकताच मार्च महिना सुरू झाला आहे आणि इकडे नागपूरसह संपूर्ण विदर्भात सूर्याची दहकता अचानक वाढली आहे. त्यामुळे विदर्भात उन्हाळ्याची सुरुवात झाल्याची अनौपचारिक घोषणा झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून तापमानात वाढ नोंदवण्यात येत आहे, त्यामुळे काही जिल्ह्यातील दिवसाचे तापमान आता ४० अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. येत्या काही दिवसांमध्ये या तापमानात सुद्धा वाढ होण्याची दाट शक्यता हवामान विभागाचे अधिकारी एम. एल. शाहू यांनी व्यक्त केली केली आहे. उत्तर-पश्चिम दिशेने येणाऱ्या उष्ण हवेमुळे विदर्भात तापमान वाढले असल्याचा निष्कर्ष हवामान विभागाने काढला आहे.
नागपूरसह विदर्भात उन्हाळ्यातील मार्च, एप्रिल, मे महिन्यात तापमानात प्रचंड वाढ नोंदवण्यात येते. दरवर्षी हे तापमान ४८ ते ४९ अंश सेल्सिअसपर्यंत देखील जाते. मात्र यावर्षी गेल्या काही वर्षातले सर्व रेकॉर्ड मोडीत निघतील कि काय अशी परिस्थिती निर्माण होत आहे. मार्च महिना सुरू होताच सूर्याची दहकता अचानक वाढली आहे. त्यामुळे आत्ताच तापमान ४० अंश सेल्सिअसच्या अगदी जवळ जाऊन पोहचले आहे. आयएमडीने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यावर्षी उकाडा जास्त राहणार आहे