नागपूर - जिल्हा परिषदेच्या २०० पेक्षा जास्त शाळांमध्ये वीज नाही. तर १७२ वर्ग खोल्या धोकादायक असताना आता काही शाळांमध्ये शिक्षकच नसल्याची बाब उघडकीस आली आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यात एकूण १ हजार ५३९ शाळा आहेत. मात्र, या शाळांमध्ये १४० शिक्षकांची कमतरता असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात दिसत आहे.
नागपूर जि.प. शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता, विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात - नागपूर
नागपूर जिल्हा परिषद शाळांमध्ये १४० शिक्षकांची कमतरता असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात दिसत आहे.
शैक्षणिक सत्र सुरू होऊन ४५ दिवस होत आले आहेत. मात्र, सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या जागी पुन्हा नवीन शिक्षक रुजूच झाले नाहीत. शाळेत विद्यार्थी आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षकच नसल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे.
वर्गावर शिक्षकच नसेल तर विद्यार्थ्यांनी कसले धडे गिरवावे, असा प्रश्न पालक वर्गाकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जिल्ह्यातील नरखेड आणि रामटेक या तालुक्यातील ३ ते ४ शाळांमध्ये शिक्षक नसल्याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली. विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असलेल्या शाळेतील शिक्षकांनाच शिक्षक नसलेल्या शाळांत तात्पुरते शिकवायला पाठवण्यात येत असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी चिंतामण वांजरी यांनी दिली.