नागपूर - शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राच्या मदतीची वाट बघू नये. सर्वात आधी राज्याच्या तिजोरीतून शेतकऱ्यांना मदत करावी. नंतर जेव्हा केंद्राकडून मदतनिधी प्राप्त होईल तेव्हा तो राज्याच्या तिजोरीत पुन्हा जमा करावा, असा सल्ला विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला आहे.
राज्यात सत्ता संघर्षाला पूर्णविराम लागल्यानंतर पाहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात आगमन झाले. यावेळी भाजपकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, "राज्याच्या आर्थिक स्थितीवर नव्या सरकारने श्वेत पत्रिका जाहीर करावी. आम्ही त्याचे स्वागत करू. मात्र, ते करण्यापूर्वी राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेणे गरजेचे आहे"