नागपूर -परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नागपूर महापालिकेकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये शहरातील इंदिरा गांधी रुग्णालय आणि पाचपावली सुतीकागृहात लसीकरण करून दिले जाणार आहे. परदेशात जाण्यापूर्वी लसीकरण करण्यासाठी काही कागदपत्रासह त्यांनी गुगलशीट फार्मवर माहिती भरून द्यावी, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी केले आहे.
'या' कागदपत्रांची आवश्यकता
या विशेष मोहिमे अंतर्गत ४५ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणासह परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या १८ ते ४४ वयोगटातील विद्यार्थ्यांचे परदेशात शिक्षण घेत असल्याचे कागदपत्र तपासून लसीकरण केले जाणार आहे. आठवड्याला गुरूवार आणि शुक्रवार असे दोन दिवस हे लसीकरण राहणार असून मनपाच्या गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालय व पाचपावली सुतीकागृह येथे या विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे. माहिती भरतांना १४ ते ४४ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळाल्याचे निश्चिती पत्र, परदेशी व्हि़जा, व्हिजा मिळविण्यासाठी संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त झालेले महत्त्वाची कागदपत्रे गुगल फॉर्मसोबत अपलोड करणे आवश्यक आहे.
मनपा करणार कागपत्रातील माहितीची पडताळणी
गुगल फॉर्मवर माहिती भरल्यानंतर तो अर्ज मनपाकडून तपासल्या जाणार आहे. अर्जातील संपूर्ण बाबींची सहनिशा करून मनपाद्वारे संबंधित अर्जदार विद्यार्थ्याला कन्फर्मेशन ई-मेल पाठविण्यात येईल. यानंतर आधारकार्ड, पासपोर्ट, प्रवेश निश्चित झाल्याचे पत्र, व्हिजा आदी कागदपत्रे घेऊन संबंधित विद्यार्थ्याला लसीकरण केंद्रावर जावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक सूचना व माहितीकरिता नियंत्रण कक्षामध्ये 07122567021 या क्रमांकावर किंवा nmc.vaccine@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधता येईल. याकरिता विद्यार्थ्यांना २४ तासापूर्वी https://forms.gle/i1kgw3Gkp2VEu6TD7 या लिंकवर क्लिक करून गुगल फॉर्मवर आवश्यक माहिती भरणे अनिवार्य असणार आहे.
हेही वाचा-राज्यातील वेगवेगळ्या कारागृहांमधील 13 कैदी, 9 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू