महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरातील शासकीय कोविड सेंटरमध्ये सुविधांचा अभाव, आर्थिकदृष्ट्या संपन्न रुग्णांना हवा खासगी रुग्णालयातच उपचार

कोरोनाच्या रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढायला लागल्याने दाखल रुग्णांच्या अडचणीही वाढल्या आहेत. शिवाय इतरही सुविधांचा प्रचंड अभाव असल्याने आर्थिक संपन्नता असणाऱ्या रुग्णांना शासकीय रुग्णालयात उपचार नको असून त्यांचा खासगी रुग्णालयांकडे कल वाढलेला आहे.

शासकीय कोविड सेंटरमध्ये सुविधांचा अभाव
शासकीय कोविड सेंटरमध्ये सुविधांचा अभाव

By

Published : Jul 22, 2020, 6:51 PM IST

नागपूर :येथे विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारींना पुन्हा सुरुवात झाली आहे. शेकडो रुग्णांसाठी बाथरुमच्या संख्येची अपूर्ण व्यवस्था असल्याने पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह होण्याऱ्या रुग्णांना पुन्हा संक्रमणाचा धोका उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय इतरही सुविधांचा प्रचंड अभाव असल्याने आर्थिक संपन्नता असणाऱ्या रुग्णांना शासकीय रुग्णालायत उपचार नको आहेत, त्यांचा खासगी रुग्णालयांकडे कल वाढलेला आहे.

गेल्या महिनाभरापूर्वी राज्य सरकारने खासगी रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार करण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर नागपुरातसुद्धा एका खासगी रुग्णालयाला ४५ रुग्णांवर उपचाराची परवानगी देण्यात आली आहे. आजघडीला त्या खासगी रुग्णालयात २८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातच शासनाच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे अनेकांनीसुद्धा आता पैसे खर्च करून खासगी रुग्णालयात उपचार मिळावा या करिता प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, खाटा उपलब्ध नसल्याने प्रतीक्षा यादी वाढत आहे. नागपुरातील कोविड सेंटरची परिस्थिती फार वाईट नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढायला लागल्याने दाखल रुग्णांच्या अडचणीही वाढल्या आहेत. नागपुरात ०७ ठिकाणी असलेल्या कोविड सेंटर मध्ये ११३२ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात(मेयो) २२९, शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (मेडीकल) २४९, एम्समध्ये ५०, कामठी येथील मिलीटरी हॉस्पिटलमध्ये २२ आणि खासगी रुग्णालयात २८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, मध्यवर्ती कारागृहात तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये १२४ आणि आमदार निवास मध्ये ३२७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

नागपुरात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ६२.४७ टक्के इतके आहे. तर, मृत्यूदर हा १.८२ इतका आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत असल्यानेच कोविड सेंटरमध्ये सुविधांचा अभाव असला तरी शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर आणि परिचरिकांनी तब्बल दोन हजार रुग्ण ठणठणीत बरे केले आहेत. म्हणजेच खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांपेक्षा शासकीय कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्यांचा अनुभव फार जास्त आहे, हे देखील विसरून चालणार नाही. तर दुसरीकडे नागपुरात कोरोना रुग्णसंख्येने तीन हजारांचा आकडा पार करताच मृत्यदर देखील वाढत आहे. त्यामुळे, नागपुरात कोरोना आउट ऑफ कंट्रोल झाला का असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. महानगर पालिका कोरोनाचा प्रचार आणि प्रसार रोखण्यात अपयशी ठरली आहे का, असे प्रश्नदेखील विचारले जाऊ लागले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details