सोलापूर- बार्शीतील उस्मानाबाद जनता बँकेतील 68 लाखांची चोरी करणाऱ्या आरोपींच्या बार्शी पोलीसांनी 24 तासात मुसक्या आवळल्या. चोरीस गेलेल्या 68 लाखांपैकी 67 लाख रूपये हस्तगत करून 2 आरोपींना जेरबंद केले.
बार्शी शहरातील सोमवार पेठ, घोडे गल्ली येथे उस्मानाबाद जनता सहकारी बँकतील 68 लाख रुपयांची चोरी झाली होती बँकेत पासिंग ऑफिसर बाबासाहेब कांबळे यांचे कपाट उघडे असल्याचे शिपाई दिंगबर शिंदे यांचे निदर्शनास आले त्यानंतर त्यांनी व्यवस्थापक शशिकांत देशमुख यांना कळविले. त्यावेळी बाबासाहेब कांबळे व कॅशिअर अर्जुन देवकर यांच्या लोखंडी कपाटात ठेवलेल्या तिजोरीच्या चाव्या कोणीतरी वापरून तिजोरीतील 68 लाख 43 हजार 800 रूपयांची रोख रक्कम चोरून नेल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना या चोरीची माहिती दिली.
या गुन्ह्याची माहिती मिळताच तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी परिसरातील व बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. गोपनीय माहिती व तांत्रीक बाबींचा अभ्यास करून घटना घडली. त्यावेळी, कर्तव्यावर असणारा बँकेचा शिपाई विजय परिट व बँकेचा एक कर्जबाजरी असलेला खातेदार महावीर कुंकूलोळ यांच्यावर संशय आल्याने त्या दोघांना पोलिसांनी चैकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले.
बँकेची तिजोरी उघडण्यासाठी एकूण तीन चाव्यांची आवश्यकता असते. त्या चाव्यांपैकी दोन चाव्या या बँक कॅशिअर अर्जुन देवकर यांच्या कपाटात तर मास्टर चावी ही बँकेचे पासिंग अधिकारी बाबासाहेब कांबळे यांच्या कपाटात ठेवलेली असते याची माहिती आरोपींनी काढली होती. त्या माहितीच्या आधारे त्या दोन्ही कपाटाच्या बनावट चाव्या तयार करून घेतल्या होत्या. त्या बनावट चाव्यांच्या सहाय्याने कपाट उघडून त्यात ठेवलेल्या तिजोरीच्या चाव्या काढून त्याने तिजोरीची रक्कम चोरल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले.