नागपूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील भान विसरले असल्याचं सांगत शिवसेनेचे प्रवक्ते किशोर कान्हेरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. चंद्रकांत पाटील तुमची अडचण आम्ही समजू शकतो, तुम्हाला सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशा शब्दात कान्हेरे यांनी चंद्रकांत पाटील यांना चिमटा काढला आहे.
चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना चिमटा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 12 वीच्या परीक्षेबाबत राष्ट्रीय धोरण असावे. यासाठी हवे असल्यास मी पंतप्रधान यांच्याशी बोलेन आणि गरज वाटल्यास पत्र व्यवहार करेन, अशी भूमिका जाहीर केली होती. त्यावर टीका करताना चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला होता. उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरे यांचे लग्न जमावे म्हणूनही पंतप्रधानांना पत्र लिहितील, असे वक्तव्य केले होते. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना प्रवक्ते किशोर कान्हेरे यांनी चंद्रकांत पाटील यांचा तोल पूर्णपणे ढळल्याची टीका केली आहे.