नागपूर - परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्याचे काम सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गुरुवारी पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहेत.
हेही वाचा -कोश्यारी पहिलेच नाहीत.. यापूर्वीही राज्यपालांचे अनेक निर्णय ठरले वादग्रस्त
विदर्भात सोयाबीन, कापूस, धान, संत्रा व मोसंबीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सत्ता स्थापनेच्या घोळात राजकारणी व्यग्र आहेत. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी शासकीय मदतीची वाट बघतो आहे. अशा परिस्थितीत शेतीचे नुकसान पाहण्यासाठी शरद पवार येत असल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
हेही वाचा -राज्यातील सत्तासंघर्षात विदर्भ वेगळा करून मुख्यमंत्री द्या - राम नेवले
पवार पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर असले, तरी ते नेमक्या कोणत्या भागात जाणार आहेत हे समजू शकले नाही. पीक पाहणीचा कार्यक्रम झाल्यानंतर १५ नोव्हेंबरला पवार नागपूर येथील मेकोसाबाग शाळेच्या मैदानावरील बिरसामुंडा जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.