नागपूर - राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. राज्यातील शेतकऱ्यांसाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही बोलेन, असे पवार यावेळी म्हणाले. पवारांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून झालेल्या नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हेही वाचा - देवेंद्र फडणवीसांच्या 'मी पुन्हा येईन' वर शरद पवारांची टोलेबाजी
पवार म्हणाले की, गेले काही दिवस निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतीवर आलेल्या संकटाबद्दल माहिती मिळत होती. म्हणून तातडीने यावे असे वाटत होते. मात्र, तेव्हा राज्यात राजकीय घडामोडी घडत असल्याने मला तातडीने येता आले नाही. काल अवकाळी पावसाने झालेली शेतीची स्थिती पाहिली. अवकाळीच्या या संकटाने सर्व महत्त्वाच्या पिकांवर परिणाम झाला आहे. संत्रा, मोसंबी, धान, कापूस, सोयाबीन, ज्वारी अशा सर्व पिकांवर याचा परिणाम झाला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे पवार म्हणाले. अवकाळी पावसामुळे नागपूरसह विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. संत्र्याचा संपूर्ण बहर वाया गेला आहे.