नागपूर- जिल्ह्यातील काटोल येथील रिक्त असलेल्या जागी विधानसभेची पोटनिवडणूक लोकसभेसोबत ११ एप्रिलला घेण्यात येणार आहे. परंतु, जो उमेदवार विजयी होईल त्याला केवळ तीनच महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. अशा परिस्थितीत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगाकडे ही निवडणूक रद्द करण्याची मागणी करावी नाहीतर उमेदवारी अर्ज दाखल करू नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.
अल्पकालीन काटोल विधानसभा पोटनिवडणूक रद्द करावी - शरद पवार - vidhansabha election
काटोल पोटनिवडणूक रद्द करण्याची मागणी करावी नाहीतर उमेदवारी अर्ज दाखल करू नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई येथे केले.
राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारकीच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यासाठी मुंबई येथे आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. याच पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काटोल विधानसभेच्या पोटनिवडणूक संदर्भातही भाष्य केले. जो कोणी उमेदवार निवडून येईल त्याला जून, जुलै, ऑगस्ट हे तीनच महिने काम करायला मिळणार आहेत. यानंतर साधारणतः ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात परत विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. अशा परिस्थितीत निवडणूक घेण्याची काहीच गरज नव्हती.
सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात तक्रार करून निवडणूक रद्द करण्याची मागणी करावी. जर आयोग आपल्या निर्णयावर ठाम असले तर सर्वच राजकीय पक्ष सोबतच निवडणूकमध्ये आपला विश्वास असणाऱ्या घटकांनी एकत्र येऊन येथे कोणताही उमेदवारी अर्ज दाखल करू नका. नाहीतर एखादा सामाजिक कार्यकर्ता, शिक्षण क्षेत्रातील प्रभावी व्यक्ती, पत्रकार यासह इतर काही नावे पुढे घेऊन या पैकी एकाला उमेदवारी अर्ज भरायला लावावा. जेणेकरून ही निवडणूक बिनविरोध होईल. यामुळे प्रशासनाचा त्रास सुद्धा वाचेल.