मुंबईSarsanghchalak Mohan Bhagwat- शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारांना सरसंघचालक मोहन भागवत कानमंत्र देणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले सरसंघचालक दिवंगत केशव बळीराम हेडगेवार यांना अभिवादन करण्यासाठी यंदा प्रथमच शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांनाही निमंत्रण पाठविण्यात आलं आहे. उद्या (१९ डिसेंबर) सकाळी ८ वाजता सर्व आमदार आणि खासदार यांना संघ मुख्यालयात हजर राहण्यासाठी पत्र पाठवण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे ज्या आमदारांकडे स्वतःचे वाहन नाही अशा आमदारांसाठी आमदार निवासापासून बसची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
काय कानमंत्र देतात याकडे लक्ष -नागपूर हिवाळी अधिवेशनकाळात दरवर्षी दिवंगत हेडगेवार यांना अभिवादन करण्यासाठी भाजपाचे सर्व आमदार आणि खासदार संघ मुख्यालयात जातात. यंदा प्रथमच भाजपाच्या आमदारांसोबतच शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांना निमंत्रण देण्यात आलं आहे. या निमित्ताने यंदा पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार-खासदार उपस्थित राहणार आहेत. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत हे आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने तिन्ही पक्षांच्या आमदारांना आणि खासदारांना काय कानमंत्र देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
बाळासाहेबांसह उद्धव ठाकरेंनी राखले होते अंतर -शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हयात असताना शिवसेनेचे आमदार कधीच संघ मुख्यालयात गेले नाहीत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या हातात पक्षाची सूत्रं आल्यानंतर सुध्दा शिवसेना आमदार कधीच संघाच्या मुख्यालयात गेले नाहीत. तसंच दुसऱ्या बाजूला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने संघ आणि हिंदुत्वापासून नेहमीच अंतर ठेवलं होतं. कारण संघाची विचारधारा त्यांना कधीच पटली नाही. परंतु आता शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा फूट पडली असल्यानं शिंदे गटाची विचारधारा व अजित पवार गटाची विचारधारा ही संघाच्या विचारधारेशी सहमत आहे का? हा प्रश्न सुद्धा निर्माण झाला आहे.