नागपूर -पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सांसद आदर्श ग्राम ( Sansad Adarsh Gram Yojana ) योजनेत नागपूरचे खासदार तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Union Minister Nitin Gadkari ) यांनी 2014 मध्ये उमरेड तालुक्यातील पाचगाव दत्तक ( Adopted Pachgaon in Umred taluka ) घेतले. गाव दत्तक घेतल्यानंतर कोटीच्या घरात निधी देत सोयी सुविधा उपलब्ध करून दिले. परंतु स्थानिक ग्रामपंचायतच्या नियोजनाच्या अभावामुळे गावात नागरिकांची पाण्यासाठी ( Water scarcity Pachgaon ) भटकंती सुरू आहे. गावातली नळ योजना आणि लोडशेडिंगमुळे नियोजन फिसकटेल. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
नागपूर पासून २५ किमी अंतरावर पाचगाव आहे. साडे चार हजार लोकवस्तीच पंचक्रोशीत मोठे गाव म्हणून ओळख आहे. देशातील इतर गावात असणाऱ्या समस्या पाचगावातही पाहायला मिळाले. स्थानिक गावातील राजकारण आणि दूरदृष्टी नियोजनाचा अभाव पाणी टंचाईला कारणीभूत ठरले. मुख्य रस्त्यापासून गावाचा दिशेने जाताना जिकडे तिकडे सिमेंट रस्ते झाले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, वाचनालय, शेतकऱ्यांसाठी ओटे, शेतकरी भवन, वाचनालय, डिजिटल सोय म्हणून वायफाय अशा सोयीसुविधा नजरेत भरतात. पण गावात शिरताच पाण्याची अडचण सांगणारे ते घागरभर पाणी त्या विकासावर पाणी फेरून जात असल्याचे चित्र प्रत्येक घरापुढे असणारे पाण्याचे भांडे बोलून जाते.
अशी आहे खासदार आदर्श ग्राम योजना :2014 मध्ये पहिल्यांदा नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले. त्यावेळी त्यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी खासदार आदर्श ग्राम योजना जाहीर केली होती. या योजने अंतर्गत खासदारांनी आपापल्या लोकसभा मतदारसंघात एक गाव दत्तक घेऊन त्या गावाला आदर्श गाव बनवावे, अशी अपेक्षा होती. अशा गावात स्वच्छता राखणे, अंगणवाडीत मुलांना प्रवेश देणे, गाव झाडे लावून हरित करणे, आरोग्याच्या संपूर्ण सुविधा या गावात पुरविणे, अशी कामे खासदारांच्या वतीने करणे अपेक्षित होते. विशेष म्हणजे गावांचा वाढदिवस साजरा करून गावातील ज्येष्ठ नागरिक स्वातंत्र्य सेनानी शहिद कुटुंबियांचा सन्मान करणे, असे विविध कार्यक्रम खासदारांनी राबविणे या योजनेअंतर्गत अपेक्षित आहे.
गावातील पाणी प्रश्न :गावात सिमेंट काँक्रीटचे बांधकाम केलेले घर असो की मातीचे घर एक चित्र समान होते. ते म्हणजे पाण्याचे भांडे भरलेले ड्रम, नळावर असलेल्या मशीन. गावाच्या शेवटी झोपडपट्टी भागातही तेच चित्र आहे. त्या परिसरात काही घरात नळच नाही, ज्यांचाकडे आहेत तर त्याना 15 ते 20 मिनिट पाणी येत नाही. त्यामुळे एकीकडे पोटाची खळगी भरण्यासाठी कामाचा शोध दुसरीकडे घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतातून पाणी भरण्यासाठी विहरिवर रांगा. हे चित्र आहे सांसद आदर्श ग्राम पाचगावचे आहे.