नागपूर :संत भोजाजी महाराजांचा जन्म वर्धा जिल्हाच्या हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा या गावी झाला. आजनसरा येथे भोजाजी महाराजांचे समाधीस्थळ आहे. आजनसरा हे गाव नागपूर -हैदराबाद महामार्गावरील वडनेरनजीक आहे. महाराजांच्या समाधी स्थळाला भेट देण्यासाठी विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून भक्त येतात. इथे भक्तांनी मागितला नवस पूर्ण होतोचं अशी भावना आहे. त्यामुळे नवस फेडायला बुधवारी किमान पाचशे ते हजार कुटुंबाकडून स्वयंपाक केला जातो. त्यातही महाराजांना पुरणपोळीचा प्रसाद आवडत असल्याने दर बुधवारी आणि रविवारी पाच ते सात हजार किलो डाळीचे पुराण शिजवले जाते. पुरणाचा प्रसाद ग्रहण करण्यासाठी दर बुधवारी पन्नास हजारांपेक्षा जास्त भाविकांची मांदियाळी आजनसरा येथे असते.
आजनसराय होणार पर्यटनस्थळ : आजनसरा या गावात कधी काळी पंढरपूरच्या विठ्ठलाचे भक्त असलेले संत भोजाजी महाराज होऊन गेले. भोजाजी महाराजांचे समाधीस्थळ इथं आहे. आजनसरा येथे राहणाऱ्या देवाजी महाराजांनी सन- १९५५ पासून चैत्र द्वादशीला भोजाजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात केली. दरवर्षी भोजाजी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव साजरा होतो, त्यावेळी तर भक्तांचा आकडा दीड ते दोन लाखांचा घरात असतो. त्यामुळे आजनसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास सुरू आहे.
नवस फेडण्यासाठी भक्तांची तोबा गर्दी :भोजाजी महाराजांना कुणी पाहिले नसले, तरी ते मंदिरातील समाधीस्थळी आजही असल्याचा अनुभव भक्तांना येतो. महाराजांना पुरणाचा नैवेद्य करण्याची परंपरा आहे. त्यामुळे काही हौस म्हणून तर काही नवस फेडण्यासाठी येथे पुरण पोळीचा स्वयंपाक करतात. महाराजांची महती मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने, इथं भक्तांचा ओढा मंदिराकडे वाढत गेला आहे.
दगडी पाट्यावर पुरण वाटले जायचे : दर बुधवारी आणि रविवारी महाराजांना नैवेद्य करण्याची परंपरा आहे. पुर्वीच्या काळी म्हणजे दहा ते पंधरा वर्षांपूर्वी फारश्या सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने पुरणाची डाळ परंपरागत पद्धतीने म्हणजे पाटा वरवंट्यावर वाटल्या जात होती. भक्तांची वाढती संख्या आणि पुराणाचे प्रमाण फार अधिक झाल्यामुळे आता या ठिकाणी पुरण दळण्याची अनेक विद्युत यंत्रे लावण्यात आले आहेत.