नागपूर- जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रुग्णांचा आकडा 44 हजारांच्या पुढे गेला आहे. सौम्य लक्षणे किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच राहण्यास सांगितले जात आहे. अशा रुग्णांसाठी नागपूर महानगरपालिका आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोक कल्याण समितीने 'मिशन विश्वास' उपक्रम सुरू केला.
या उपक्रमाच्या माध्यमातून घरी आसोलेशनमध्ये असलेल्या आणि इतर कोरोना रुग्णांशी फोनवरून संपर्क करणे, तज्ज्ञ डॉक्टरांचा त्यांच्याशी संपर्क घडवून आणणे, गरज भासल्यास रुग्णांना औषधे किंवा काही गरजेच्या वस्तू पाठवणे आणि रुग्णांना धीर देणे. यासाठी 'मिशन विश्वास'ची सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी संघाच्या स्वयंसेवकांना दोन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. शिवाय या पथकामध्ये डॉक्टरांचाही सहभाग आहे. 'मिशन विश्वास'च्या माध्यमातून आतापर्यंत १५ हजार रुग्णांशी संपर्क साधल्याची माहिती जेष्ठ स्वयंसेवक दिलीप गुप्ता यांनी दिली.