नागपूर Rashtriya Swayamsevak Sangh :मागास जातींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यासाठी बिहार राज्याने राज्यांतर्गत जातनिहाय जनगणना केली आहे. बिहारच्या धर्तीवर आता महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे. तसंच आरक्षणावर तोडगा काढायचा असेल तर जातीनिहाय जनगणना हाच उपाय असल्याचंही राजकीय नेत्यांकडून बोललं जातंय. असं असतानाच आता जातीनिहाय जनगणनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळं आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
नेमकं काय म्हणाले श्रीधर गाडगे : जातीनिहाय जनगणनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध असल्याची भूमिका आज (19 डिसेंबर) विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी विषद केली आहे. जातीनिहाय जनगणना झाल्यास कमी संख्या असलेल्या समाजाच्या मनात न्यूनगंड किंवा जास्त संख्येनं असलेल्या समाजाच्या मनात वेगळी भावना निर्माण होईल असा तर्क त्यांनी यावेळी दिला. जातीनिहाय जनगणना देशाला काय फायदा आहे असा सवाल देखील त्यांनी राजकीय पुढाऱ्यांना केलाय. ते म्हणाले की, माझ्या मते जातीनिहाय जनगणनेचा काहीच फायदा नाही. त्यामुळं जातीनिहाय जनगणना करणं गरजेचं आहे असं मला वाटतं नाही. तसंच ज्यांना वाटतं की जातीनिहाय जनगणना करणं आवश्यक आहे, त्यांनी याचा काय फायदा होईल हे सांगावं, असंही ते म्हणाले.
न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता : पुढं ते म्हणाले की, जातीय जनगणनेमुळं अनेकांच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. याचं कारण म्हणजे जर जातीनिहाय जनगणना झाली, तर प्रत्येकाला कळेल की आपल्या समाजात किती आणि दुसऱ्या समाजात किती संख्या आहे. यामध्ये ज्यांची संख्या कमी आहे, त्या लोकांच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळं ते दबून राहण्याची शक्यता आहे. तसंच ज्यांच्या समाजाची संख्या जास्त आहे ते लोक वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील.