नागपूर - अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत नागपूर कारागृहात दाखल असलेल्या कुख्यात ड्रग तस्कराने आत्महत्येचा प्रयत्न केला. फिरोज खान उर्फ अबू खान असे या आरोपीचे नाव आहे. मात्र, त्याचा हा प्रयत्न फसला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर कारागृहातील कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न
अबू खान याने चादर फाडून तयार केलेल्या पट्ट्या एकमेकांना बांधून एक फास तयार केला होता. त्या फासाचे एक टोक गळ्यामध्ये अडकवून दुसऱ्या टोकाला प्लास्टिकचा पाण्याचा मग बांधून तो मग छतावरील पंख्याला अडकवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
नागपूर मध्यवर्ती कारागृहात ड्रग तस्करीच्या आरोपात 48 वर्षीय अबू खान गेल्या काही महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत आहे. अबू खान याने चादर फाडून तयार केलेल्या पट्ट्या एकमेकांना बांधून एक फास तयार केला होता. त्या फासाचे एक टोक गळ्यामध्ये अडकवून दुसऱ्या टोकाला प्लास्टिकचा पाण्याचा मग बांधून तो मग छतावरील पंख्याला अडकवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु, आत्महत्या करताना प्लास्टिकचा मग खाली पडला आणि याचा आवाज कारागृहात कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कानावर पडला. ते लगेच घटनास्थळी धावले. या घटनेची माहिती त्यांनी वरिष्ठांना दिली. त्यानंतर अबुला खाली उतरविण्यात आले. या प्रकरणी तुरुंग प्रशासनाच्या तक्रारीवरून धंतोली पोलीस ठाणे येथे अबू खान विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.