नागपूर- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या इटलीत झालेल्या जन्मावरून त्यांची हेटाळणी करण्यात भाजपचा जन्म गेला. मोदी आणि त्यांचे असंस्कृत सहकारी, सोनिया गांधी, राहुल गांधी इटलीवरुन किती अश्लिल, अश्लाघ्य बोललेत याची गिणतीच करता येणार नाही. पण, थाळ्या वाजवा, लाईट विजवा, मेणबत्त्या लावा या कल्पना मात्र त्यांनी थेट कोरोनाग्रस्त इटलीवरुन आयात केल्या आहेत. आपले अपयश झाकायला, लोकांना एक "इव्हेंट" द्यायला यांना सोयिस्कररित्या इटली चालते, तिथे यांचे बेगडी देशप्रेम, हिंदुत्व आडवे येत नाही, अशी टीका ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री डॉ. नीतीन राऊत यांनी भाजप व मोदी यांच्यावर केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची हाफ पॅन्टसुद्धा डॉ. मुंजे यांनी इटलीच्या बेनिटो मुसोलिनीकडूनच आणली होती असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
कोणी कधी, किती दिवे लावावे आणि विझवावे, कुठल्या कारणासाठी पेटवावे आणि विझवावे, हा प्रत्येकाचा खासगी प्रश्न आहे. मी राज्याचा ऊर्जामंत्री असलो तरी त्यात मी हस्तक्षेप करु शकत नाही. लोकांच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा माझा आणि माझ्या पक्षाचा स्वभाव सुद्धा नाही. कोणी काय खावे, काय प्यावे, काय लावावे हे सुद्धा आजकाल संस्कृती रक्षक ठरवतात. पण आम्ही वेगळे आहोत अशी, टीका देखील त्यांनी भाजपवर केली आहे.
पंतप्रधानांनी रविवारी (दि. 5 एप्रिल) घरातील विजेचे दिवे रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी बंद करा आणि पणत्या, मेणबत्त्या लावा असे सांगितले. यावर डॉ. राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, मोदींच्या घोषणेनंतर मी लगेच माझ्या सर्व ज्येष्ठ अभियंत्यांसोबत तातडीने चर्चा केली. अचानक दिवे बंद झाले तर विद्युत पुरवठ्यावर किती तांत्रिक अडचणी, भार येईल हे स्पष्ट करणारा एक व्हिडीओ मी कालच प्रसारित केला. कोरोनाचा सामना करण्यासाठी भारत एकजुटीने उभा आहे, हे प्रत्यक्ष दिसताना, कोरोनाचा मुकाबला पणत्या लावून आणि दिवे विझवून कसा होणार?, असा सवाल देखील डॉ. राऊत यांनी केला आहे.