नागपूर- येथील एका कापड दुकानातील चेंजिग रुममध्ये छुप्या कॅमेऱ्याने तरुणीचे चित्रीकरणाच्या संतापजनक प्रकरणानंतर नागपूर पोलिसांनी अत्यंत कडक पावले उचलली आहेत. नागपूर पोलिसांचे एक विशेष पथक शहरातील विविध मॉल्स आणि कापड दुकानांमध्ये अचानक जाऊन चेंजिंग रुम किंवा ट्रायल रुमची तपासणी करणार आहे.
आता होणार चेंजिंग रुमची अचानक तपासणी, नागपूर पोलिसांची विशेष मोहीम - चेंजिंग रूम
नागपूर पोलिसांचे एक विशेष पथक शहरातील विविध मॉल्स आणि कापड दुकानांमध्ये अचानक जाऊन चेंजिंग रुम किंवा ट्रायल रुमची तपासणी करणार आहे.
शहरातील दुकाने, मॉलच्या चेंजिंग रुममध्ये छुपे कॅमेरे तर लावलेले नाही ना यासंदर्भात ही तपासणी केली जाणार असल्याची माहिती परिमंडळ २ च्या पोलीस उपायुक्त विनिता साहू यांनी दिली आहे. या पथकातील महिला किंवा पुरुष कर्मचारी ग्राहक वेशात साधे कपडे घालून विविध मॉल्स आणि कापड दुकानात जाणार आहेत.
अचानक होणाऱ्या या तपासणीत चेंजिंग रुममध्ये छुपे कॅमेरे, मोबाईल्स, कॅमरा असलेले पेन किंवा बटन्स लावलेले आहे की नाही याची चौकशी केली जाणार आहे. शिवाय नागपूर पोलीस आता महाविद्यालयीन तरुणी आणि शाळकरी मुलींना याबाबत जागरुक बनवण्यासाठी ही विशेष मोहीम राबवणार आहे. विविध मॉल्स आणि कापड दुकानांमध्ये सेल्स मॅन किंवा सेल्स गर्ल म्हणून काम करणाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशनही बंधनकारक केले जाणार असल्याचे विनिता साहू यांनी सांगितले.