नागपूर -राज्यात येत्या आठ दिवसांत पोलिस भरतीची जाहिरात काढण्यात येणार असून 12538 जागा भरण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. यासंदर्भात आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने घंटा नाद आंदोलन करण्यात आले. यावेळी शिष्टमंडळाशी चर्चेदरम्यान त्यांनी हे आश्वासन दिले. या भरती प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्याला सुरवात झाली असून पहिल्या टप्प्यात 5297 जागा भरण्यात येणार आहे. पहिला टप्पा पूर्ण झाला की लगेच दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार असल्याचेही ते म्हणाले.
ओबीसी महासंघाच्यावतीने घंटानाद आंदोलन -
मागील तीन ते चार वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे पोलिस भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्त्वात कारण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.