महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी पोलीस सज्ज, आयुक्तांचा दावा - नागपूर कोरोना अपडेट

उपराजधानी नागपूर शहरात पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत कोरोना बाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे 15 ते 21 मार्च दरम्यान कडक टाळेबंदी लावण्याची घोषणा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे. याची अंमलबजावणीसाठी पोलीस सज्ज असल्याचा दावा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केला आहे.

police commissioner
पोलीस आयुक्त

By

Published : Mar 11, 2021, 5:16 PM IST

Updated : Mar 11, 2021, 5:29 PM IST

नागपूर- पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज (दि. 11 मार्च) शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर 15 ते 21 मार्च दरम्यान पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत संचारबंदी लावली जाणार असल्याची घोषणा केली आहे. संचारबंदीची अंमलबजावणी पोलिसांना करायची आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा पूर्णपणे तयार असल्याचा दावा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केला आहे. या काळात विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

काल (दि. 10 मार्च) नागपूर शहरात आणि जिल्ह्यात तब्बल 1 हजार 710 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. सुरुवातीला विकेंड कर्फ्यूच्या माध्यमातून कोरोनाचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र, नागरिक प्रतिसाद देत नसल्याने 15 ते 21 मार्च दरम्यान कडक कर्फ्यू लावण्यात आलेला आहे.

शहराची सीमा सील केली जाणार

या दरम्यान शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. प्रत्येक चौकात पोलिसांकडून बेजबाबदार नागरीकांवर कारवाई केली जाणार आहे. या शिवाय शहराची सीमाही सील करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.

लसीकरण सुरू राहणार

कोरोनाची साखळी तोडण्याच्या दृष्टीने शहरात 15 ते 21 मार्च दरम्यान कडक कर्फ्यू लावण्यात आलेला आहे. या काळात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी पोलीस यंत्रणा मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

काय सुरू आणि काय बंद राहील

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी 15 ते 21 मार्च दरम्यान शहरात टाळेबंदी लावण्याची घोषणा केल्यानंतर या काळात शहरात कोणत्या सुविधा सुरू राहतील या संदर्भात माहिती दिली आहे. अत्यावश्यक सेवा ज्यामध्ये रुग्णालयात, औषधांचे दुकान, डोळ्यांचे दवाखाने, चष्माचे दुकाने सुरू राहणार आहेत. याशिवाय शहरातील उद्योग सुरू राहणार आहेत. शासकीय कार्यालये 25 टक्के उपस्थितीत सुरू राहील. भाजीचे दुकाने सुरू राहतील. थेट दुकानांमध्ये दारू विक्री होणार नाही. पण, ऑनलाइन तसेच होम डिलीव्हरी मद्य विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. तर मांस विक्रीचे दुकाने सुरू राहणार आहेत. शहरातील खासगी कार्यालय मात्र पूर्णपणे बंद राहणार आहे.

हेही वाचा -नागपूर जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे नवे 1710, तर शहरात 1433 कोरोनाबाधित

हेही वाचा -नागपुरात 15 ते 21 मार्च टाळेबंदी, पालकमंत्री राऊत यांची घोषणा

Last Updated : Mar 11, 2021, 5:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details