नागपूर -नागपूरची ओळख असलेली संत्री आंबट गोड चवीसाठी आणि दर्जेदार गुणवत्ते जगप्रसिद्ध आहे. नागपूर आणि अमरावती जिल्हात मोठ्या प्रमाणात संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र, यावर्षी उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असल्याने संत्राचे उत्पादनचे धोक्यात आले आहे. नागपूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यांचे तापमान 45 डिग्रीच्यावर गेल्यामुळे संत्राच्या झाडाला वरील संत्र्याचे फळ गळून पडत आहे. सोबतच ब्लॅक फंगस ( Black Fungus ) नावाचा रोग आल्याने सुद्धा संत्र्याची गळती मोठ्याप्रमाणात वाढल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
नागपूर जिल्ह्यातील नरखेड आणि काटोल तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. फेब्रुवारी महिन्यात थंडीचे प्रमाण कमी झाल्यानंतर वातावरणात बदल होऊन उष्णतेचे प्रमाण वाढले. मार्च आणि एप्रिल महिना तर प्रचंड तापल्यामुळे बहुतांश संत्र्याच्या झाडांवरील संत्रा हा गळून पडतो आहे. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने सिंचनासाठी पाण्याची चांगली सोय आहे. मार्च महिन्यापासूनच तापमान 42 अंशापर्यंत गेले आहे तर एप्रिलमध्ये तापमानाचा पारा हा 45 ते 46 अंशापर्यंत पोहोचला. संत्र्याच्या बागेत सिंचन असूनही गळतीचे प्रमाण वाढतच आहे. उष्णतेचे प्रमाण पुढे ही वाढतच राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.