नागपूर - जिल्ह्यात मार्च महिन्यानंतर म्हणजेच तब्बल दोन महिन्यांनी बाधितांची रुग्णसंख्या पंधराशेच्या घरात आली आहे. यासोबतच सक्रीय रुग्णांच्या संख्येतही घट झाली असून 33 हजार सक्रीय रुग्णांवर सध्या उपचार आहे. यामुळे कोरोनाच्या संकटातून सावरायला सुरुवात झाली आहे. यात रिकव्हरी रेट वाढल्याने प्रशासनासह नागपूरकरांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात शनिवारी 11 हजार 611 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये एकूण 1510 बाधित आढळले. यापैकी शहरी भागात 774 तर ग्रामीण भागातील 724 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 48 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरी भागात 22, ग्रामीण भागात 24 तर जिल्हाबाहेरील 12 जण हे कोरोनामुळे दगावले आहे. तेच 4 हजार 780 जण कोरोनामुक्त झाले आहे. सक्रिय रुग्णसंख्येत घट होऊन 33 हजार 259 वर पोहोचली आहे. जवळपास निम्यापेक्षा जास्त रुग्ण हे या महिन्यात घटले आहे. 44 हजार जण कोरोनामुक्त झाले आहे. आतापर्यंत 4 लाख 62 हजार 110 रुग्ण कोरोना बाधित झाले आहे. यातून 4 लाख 20 हजार 331 जण हे कोरोनामुक्त झाले आहे. यात मृत्यूचा आकडा हा 8520 वर जाऊन पोहचला आहे.