नागपूर :नितीन गडकरी धमकी आणि खंडणी प्रकरणामागील मास्टरमाईंड दहशतवादी बशीरुद्दीन नूर मोहम्मद उर्फ अफसर पाशाची रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू होती. जयेश पुजारी याच्या चौकशी दरम्यान अफसर पाशाची लिंक समोर आली होती. नागपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाशाला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पाशाने घेतले होते कार दुरुस्तीचे प्रशिक्षण :दहशतवादी बशीरुद्दीन नूर मोहम्मद उर्फ अफसर पाशाने कार मेकॅनिकचे प्रशिक्षण घेतले होते. तो काही काळ सौदी अरेबियात नोकरीला देखील होता. सौदीमध्ये त्याचा पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना 'लष्कर ए तोयबा'शी संबंध आला होता. अफसर पाशा हा बंगळूरूतील एका कामगाराचा मुलगा आहे. सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्याने कार दुरुस्तीचे प्रशिक्षण घेतल्याची माहिती समोर आली आहे.
दहशतवादी कनेक्शन उघड :नितीन गडकरी यांना मिळालेल्या धमकी आणि खंडणी प्रकरणात दहशतवादी कनेक्शन उघड झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. एनआयएने प्रकरणाचा तपास सोपावण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. आज यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. नितीन गडकरी धमकी प्रकरणातचा मास्टर माईंड कुख्यात दहशतवादी बशीरुद्दीन नूर अहमदला उर्फ अफसर पाशा आणि जयेश कांथा उर्फ पुजारी सध्या नागपूर पोलिसांच्या कोठडीत आहे.
पोलिसांनी दिले ना हरकत प्रमाणपत्र :नितीन गडकरी यांना मिळालेल्या धमकी आणि खंडणी प्रकरणात दहशतवादी कनेक्शन समोर आले आहे. त्यामुळे एनआयएकडे या प्रकरणाचा तपास सोपविण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. याला नागपूर पोलिसांची परवानगी आहे, म्हणुन नागपूर पोलिसांनी 'ना हरकत प्रमाणपत्र' दिल्याची माहिती नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. न्यायालयाने परवानगी दिल्यास पुढील काही दिवसांत हा तपास एनआयएकडे वर्ग होईल, असे देखील ते म्हणाले आहेत.