नागपूर- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्ष 300 पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. २०१४ च्या निवडणुकीच्या निकालापेक्षा यावेळी भाजप व मित्रपक्षांच्या जागा वाढतील, असा दावा देखील त्यांनी यावेळी केला. २ दिवसांपूर्वी भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारी यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपूर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर शनिवारी त्यांचे नागपुरात आगमन झाले. त्यावेळी भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
भाजप राष्ट्रीय स्तरावर ३०० पेक्षा जास्त जागा जिंकेल, एवढेच नाही तर गेल्या वेळेपेक्षा २ ते ३ जागा जास्तच मिळतील, असा दावा गडकरी यांनी केला. प्रचारासाठी नरेंद्र मोदी नागपूरला येण्याची शक्यता असून अजूनपर्यंत त्यांचा पूर्ण कार्यक्रम ठरलेला नसल्याचे गडकरी यांनी सांगितले. काँग्रेस महासचिव प्रियांका गांधींनी गंगेतून प्रवास केला, गंगेचे पाणी प्यायल्या हीच आमच्या कामाची पावती असल्याचे देखील गडकरी म्हणाले.