नागपूर - मध्यवर्ती कारागृहात कोरोना अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये कारागृहात कामाला असणारे अधिकारी, कर्मचारी आणि कुटुंबिय आशा १२६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. २५ जूनला कारागृहातील एका कर्मचाऱ्यामध्ये कोरोनाचे लक्षणे आढल्यानंतर त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दाखल केले असता त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली.
दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेले बंदिवान, इतर सहकारी, अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. ज्यामध्ये तब्बल १२६ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पेरोलवर सोडललेल्या ७५० कैद्यानंतरही कारागृहात सुमारे १८०० कैदी कैद आहेत. याच कैद्यांवर नजर ठेवण्यासाठी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहातील अधिकारी आणि कर्मचारी दोन टीम्समध्ये विभागून प्रत्येकी पंधरा दिवस कारागृहाच्या आत आणि पुढील पंधरा दिवस क्वारंटाईन अशा स्वरूपात काम करत आहेत.
११ जून ते २६ जून दरम्यान तुरुंग प्रशासनातील जे अधिकारी आणि कर्मचारी कारागृहाच्या आत होते. त्यापैकी एक कर्मचारी कारागृहातून बाहेर आल्यानंतर कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर कारागृहात तैनात असलेले उर्वरीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची प्रतिदिन कोरोना चाचणी केली जात असून कोरोना पॉझिटिव्ह असलेल्यांचा आकडा १२६ झाला आहे. यामध्ये ५० पेक्षा जास्त कैद्यांचा देखील समावेश आहे