नागपूर :बऱ्याच दिवसानंतर राज्यात ईडीने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. या कारवाईत आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही, अशा कारवाया आता चालूच राहणार आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. ते नागपूर विमानतळावर बोलत होते.
मुख्यमंत्र्यांवर टीका :वर्षभरापूर्वी सत्ता संघर्षाचा डाव फसला असता तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःच्या डोक्यात गोळी घालणार होते. असा गौप्यस्फोट सरकारचे मंत्री दीपक केसरकर यांनी केल्यानंतर यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की सत्ता हे सर्वस्व आहे. सत्ता मिळाली नाही तर, मी माझ्या जीवाचे बरे वाईट करून घेईल. म्हणजे हा एका प्रकारे लोकशाहीचा पराभव आहे. सत्ता सर्वस्व नसते. लोकशाहीत तुम्हाला जनतेच्या समोर जावे लागते. जय पराजय हा आयुष्यातला अविभाज्य घटक आहे. जनतेच्या समोर जा, जनतेचे मत मिळवा आणि सत्तेवर या असे खडे बोल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सुनावले आहे.
शिंदेला मुख्यमंत्री व्हायचे होते :महाविकास आघाडी स्थापन होण्याच्या अगोदर पासूनच एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या बरोबर नव्हते. कोणाला त्यांचे व्यक्तिगत पुरावा जेव्हा पाहिजे असेल तर मी पुरावा द्यायला तयार असल्याचा गौप्यस्फोट जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. योग्य वेळ आल्यावर मी पुरावा देईल. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वीच मी मुख्यमंत्री झालो पाहिजे असे एकनाथ शिंदे यांच्या मनात होते असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.