नागपूर :विधानपरिषद पदवीधर नाशिक मतदारसंघात काल नाट्यमय घडामोडी घडल्यामुळे काँग्रेस पक्षाची गोची झाली आहे. ऐनवेळी अधिकृत उमेदवाराने अर्ज दाखल न केल्यामुळे आता निवडणूकीच्या रिंगणार काँग्रेसचा उमेदवारच राहिलेला नाही. यासर्व घडामोडीची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हायकमांडला कळवली आहे. काँग्रेसकडून बंडखोर उमेदवार सत्यजित तांबेला पाठिंबा दिला जाणार नाही असे आज नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. डॉ. सुधीर तांबेनी पक्षासोबत फसवेगिरी केली आहे. भाजप भीती दाखवून घरे फोडण्याची काम करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
हायकमांडला माहिती दिली :नाशिकमध्ये जे झाले त्याची इत्यंभूत माहिती हायकमांडला दिली आहे. त्याचा आज निर्णय होईल. काँग्रेसने सत्यजित तांबेला समर्थन दिले नाही. डॉ सुधीर तांबे कालपर्यंत बाळासाहेब थोरात यांच्या संपर्कात होते. या घटनाक्रमानंतर ते आमच्या संपर्कात नसल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हणाले आहेत. तांबे यांनी दगा फटका केला असल्याचे देखील नाना पटोले यांनी म्हटले आहे.
तेव्हा भाजपला कळेल :भाजपवर भाष्य करताना नाना पोटोले यांनीभाजपवर टीकास्त्र सोडले. भाजपला आज दुसऱ्यांचे घर फोडताना आनंद होत आहे. त्यांचे घर फुटेल तेव्हा त्यांना याचे दुःख कळेल असा टोला नाना पटोले यांनी लावला आहे.नाशिक पदवीधर निवडणूकीत चमत्कार होऊ शकतो, असे मोठे वक्तव्य महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले होते. सत्यजित तांबे यांना भाजपची उमेदवारी मिळाली तर स्वागतच आहे, असे विधानही विखे पाटील यांनी केले होते.