नागपूर - लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार नाना पटोले यांनी ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसंदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सत्ताधाऱ्यांना याची भीती वाटू लागल्याने ते ईव्हीएम मशीनमध्ये गडबड करण्याच्या प्रयत्नात असल्याचा गंभीर आरोप नानांनी केला आहे. २ व्हिडिओचा आधार घेत नानांनी हे आरोप केले असून अप्रत्यक्षरित्या त्यांनी नितीन गडकरी यांच्याकडे बोट दाखवले आहे.
ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसंदर्भात नाना पटोलेंचे सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप
ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसंदर्भात काँग्रेस पक्षाचे उमेदवार नाना पटोले यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाकरता प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून आरोप-प्रत्यारोपांचा खेळदेखील रंगू लागले आहेत. या मालिकेत पहिला आरोप केला आहे भारतीय जनता पक्षाचे माजी बंडखोर खासदार आणि यावेळी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवरून नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात उतरलेले नाना पटोले यांनी.
नानांचा आरोप आहे, की ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेले आहे त्या ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरा हे जाणीवपूर्वक बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे ईव्हीएम मशीनमध्ये मध्ये गडबड होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. गडकरींवर थेट आरोप करण्याऐवजी नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप करताना ईव्हीएमच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नदेखील उपस्थित केले आहेत. निवडणुकीपूर्वी ईव्हीएम मशीनची तपासणी करणार असून मतदानानंतर गोडाऊन बाहेर काँग्रेस पक्ष खासगी सुरक्षारक्षक नेमणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.