नागपूर - येस बँकेवर रिझर्व बँकेने निर्बंध लावल्याने याचा फटका राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला बसण्याची शक्यता आहे. नागपूर विद्यापीठाच्या येस बँकेत 191 कोटींच्या ठेवी असल्याची माहिती समोर आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ठेवी खासगी बँकेत कशा ठेवल्या हा मुद्दा लावून निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीतर्फे या प्रकरणाची चौकशीची मागणी केली आहे.
येस बँकेवर आरबीआयने अचानक निर्बंध लावल्याने याचा फटका जसा येस बँकेच्या सर्वसामान्य ग्राहकांना बसला, तसाच फटका आता नागपूर विद्यापीठालाही बसला आहे. नागपूर विद्यापीठाचे थोडेथोडके नव्हे तर तब्बल 191 कोटी रुपयांच्या ठेवी येस बँकेत आहेत. सर्वसाधारणपणे विद्यापीठाच्या ठेवी, पैसे व गुंतवणूक हे राष्ट्रीयकृत बँकेत ठेवण्यात येतात. 2017 मध्ये बँक ऑफ इंडियामध्ये नागपूर विद्यापीठाच्या ठेवी होत्या. पण त्यावेळी बँक ऑफ इंडियासोबत काही वाद झाल्याचे कारण देत या ठेवी येस बँकेत वळवण्यात आल्या. त्यावेळीही खासगी बँकेत ठेवी ठेवण्याला विद्यापीठ वर्तुळातील अनेकांचा विरोध झाला होता.
हेही वाचा -पुण्यातील कोरोनाग्रस्तांसह नागपूरमधील 3 जणांचा प्रवास, प्रवाशांवर आरोग्य विभागाची करडी नजर
राष्ट्रीयकृत बँकेचा पर्याय उपलब्ध असताना खासगी बँकेत गुंतवणूक कशाला असा प्रश्न उपस्थित केला गेला होता. परंतु, विरोधाला न जुमानता विद्यापीठ प्रशासनाने 191 कोटींच्या ठेवी येस बँकेत वळवल्या. परंतु, आता येस बँकेवर आर्थिक निर्बंध आल्याने विद्यापीठ प्रशासनाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी विद्यापीठाच्या सिनेट सभासदांनी केली आहे.
हेही वाचा -अयोध्या मंदिरासाठी एक कोटी! रामटेकच्या गडमंदिराचा निधी का थांबवला?
येस बँकेशिवाय इतर बँकेतही नागपूर विद्यापीठाच्या ठेवी व गुंतवणूक आहेत. परंतु, इतर बँकेतील गुंतवणूक ही येस बँकेच्या तुलनेत अतिशय कमी आहे. परीक्षा शुल्क व विविध स्तरातून दरवर्षी कोट्यवधींचा निधी प्राप्त होतो. येस बँकेतील रक्कम वेतन व विकासकामांवर खर्च केली जाते. आता आर्थिक व्यवहारांवर निर्बंध टाकल्याने विद्यापीठाच्या दैनंदिन खर्चावर कपात येण्याचे संकट उभे राहिले आहे. विद्यापीठाच्या विधीसभेत येस बँकेचा सदस्यांनी प्रश्न उपस्थित केल्यावर कुलगुरूंनी एक समिती स्थापन केली असून ही समिती या प्रकरणाची चौकशी करणार आहे, तसेच येस बँकेतील ठेवी राष्ट्रीयकृत बँकेत वळवण्यात येतील असे आश्वसनही कुलगुरूंनी दिले. पण, तूर्तास तरी येस बँकेवरील आर्थिक निर्बंधांमुळे विद्यापीठ आर्थिक संकटात असल्याचे दिसून येत आहे.
विद्यापीठाच्या येस बँकेतील ठेवी -
- 191 कोटी -- मुदत ठेवी
- 2.16 कोटी -- सर्वसामान्य फंड
- 30.32 कोटी -- रोख (मार्च 2019)
- 11.26 लाख -- व्याज