नागपूर- शहरात विद्यार्थ्यांना घरून शाळेत आणि शाळेतून घरी ने-आण करणाऱ्या स्कूल बस, व्हॅन आणि ऑटोंची संख्या खूप मोठी आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक करताना क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना गाडीत बसवले जात असल्याचे आणि सर्रासपणे वाहतुकीचे नियम मोडले जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासूनच नागपूरच्या वाहतूक पोलिसांनी स्कूल बस, व्हॅन आणि ऑटोवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
नागपुरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या स्कूल बससह व्हॅन, ऑटोवर कारवाईचा बडगा - पोलीस निरिक्षक जयेश भांडारकर
नागपूर शहरात विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्यांकडून मोटार वाहन कायद्याचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी वाहतूक विभागाला प्राप्त झाल्या आहेत. तक्रारींचा वाढता ओघ लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी सकाळपासूनच शहराच्या विविध भागात कारवाईला सुरुवात केली आहे.
नागपूर शहरात विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्यांकडून मोटार वाहन कायद्याचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी वाहतूक विभागाला प्राप्त झाल्या आहेत. तक्रारींचा वाढता ओघ लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी सकाळपासूनच शहराच्या विविध भागात कारवाईला सुरुवात केली आहे. यामध्ये शाळेसमोर विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी आलेल्या बस आणि वाहनाची तपासणी करून त्यातील विद्यार्थ्यांची संख्या मोजण्यात आली.
याआधी वाहतूक विभागाने वाहतुकीचे नियम पाळण्यासंदर्भात शाळा व्यवस्थापन आणि बस, व्हॅनसह ऑटो चालकांची जनजागृती केली होती. त्याचा काहीच उपयोग होत नसल्याने वाहतूक विभागाने ही कारवाई सुरू केली आहे. यावेळी अनेक वाहनचालकांवर दंडात्मक करवाई करण्यात आली. या सर्व कारवाईत सर्वात महत्वाची बाब म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी उशीर होऊ नये, याकरिता वाहतूक पोलिसांनी शाळेच्या प्रवेशद्वारांवरच कारवाईचे नियोजन केले होते. आज सुमारे २५ शाळांच्या स्कूल बसेस, व्हॅन आणि ऑटोवर कारवाई करण्यात आली आहे. तर पुढील काही दिवस ही मोहीम सुरू राहणार असल्याचे वाहतूक विभागाचे पोलीस निरिक्षक जयेश भांडारकर यांनी सांगितले.