नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना आलेल्या धमकी तसेच खंडणी प्रकरणाचा तपास करण्याची परवानगी मिळाली होती. याकरिता राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) कडून नागपूर विशेष न्यायालयात एक अर्ज दाखल करण्यात आला होता. आज या अर्जावर सुनावणी झाली असून न्यायालयाने एनआयएचा अर्ज फेटाळला आहे.
उच्च न्यायालयात जावे :एनआयएला दोन्ही खटले नागपूर येथून मुंबईला हस्तांतरित करायचे असतील, तर उच्च न्यायालयात जावे असे, आदेश नागपूरच्या विशेष कोर्टाने एनआयएला दिले आहेत. शहरातील धंतोली पोलीस ठाण्यात नोंदवलेली दोन प्रकरणे मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयात वर्ग करण्यास जिल्हा न्यायालयाने नकार दिला. धंतोली ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्यांबाबत नागपूर न्यायालयाचे स्थानिक अधिकार आहेत असे देखील म्हटले आहे.
नागपूर पोलिसांनी दिले ना हरकत प्रमाणपत्र :नितीन गडकरी यांना मिळालेल्या धमकी आणि खंडणी प्रकरणात दहशतवादी कनेक्शन समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपावण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. याला नागपूर पोलिसांची परवानगी आहे. म्हणून नागपूर पोलिसांनी ना हरकत प्रमाणपत्र दिल्याची माहिती नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. न्यायालयाने परवानगी दिल्यास पुढील काही दिवसात हा तपास एनआयएकडे वर्ग होईल असे देखील ते म्हणाले आहेत.
अफसर पाशाचे नागपूर कनेक्शन : नागपूर पोलिसांकडून अफसर पाशाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्याने धक्कादायक खुलासे करण्यास सुरुवात केली आहे. अफसर पाशाचे नागपूर कनेक्शन देखील चौकशी दरम्यान उघड झाले आहे. तो २००३-२००४ मध्ये तो नागपुरात वास्तव्याला होता. चौकशी दरम्यान तो वारंवार उत्तरे बदलत असल्याची माहिती पुढे आली आहे. एनआयएचे पथक देखील त्याची चौकशी करणार असल्याची शक्यता असून १९ जुलैपर्यंत अफसर पाशाला पोलीस कोठडी मिळाली आहे.