नागपूर- रेडिमेड कपड्याच्या शोरूमच्या चेंजिंग रूममध्ये मोबाईल कॅमेरा आढळून आल्यानंतर नागपुरात पालकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी अल्पवयीन आणि सज्ञान विद्यार्थिनींना लैंगिक गुन्हेगारीची जाणीव करून देण्यासाठी आणि जागृततेसाठी मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. २६ ऑगस्टपासून जागृती अभियानाची सुरवात होणार आहे. हे अभियान २६ ते ३० ऑगस्ट दरम्यान संपूर्ण शहरात राबवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विनिता साहू यांनी दिली.
लैंगिक गुन्हेगारीची जाणीव करून देण्यासाठी नागपूर पोलिसांची जनजागृती मोहीम - campaign
नागपूर पोलिसांनी अल्पवयीन आणि सज्ञान विद्यार्थिनींना लैंगिक गुन्हेगारीची जाणीव करून देण्यासाठी आणि जागृततेसाठी मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. हे अभियान २६ ते ३० ऑगस्ट दरम्यान संपूर्ण शहरात राबवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विनिता साहू यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी एका महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने लैंगिक गुन्हेगारी सारख्या गंभीर आणि महत्त्वाच्या विषयाला वाचा फोडली होती. ती तरुणी नवा गणवेश खरेदी करण्यासाठी फ्रेंड्स नावाच्या दुकानात गेली असताना त्या दुकानाच्या चेंजिंग रूममध्ये मोबाईल कॅमेरा लपवून ठेवण्यात आला होता. ही बाब वेळेतच तीच्या लक्षात आल्याने या किळसवाण्या प्रकाराबद्दल वाचा फोडत तीने थेट पोलीस ठाणे गाठून लैंगिक गुन्हा उघडकीस आणला. त्यानंतर पालकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता नागपूर पोलिसांनी शाळकरी विद्यार्थिनी, महाविद्यालयीन तरुणींसह महिला वर्गाला लैंगिक गुन्हेगारीची जाणीव करून देण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या नागपूर शहरात कार्यरत असलेल्या पोलीस उपायुक्तांपैकी ३ महिला अधिकारी आहेत. त्यामुळे हा उपक्रम शहर पोलीस विभागातील ३ महिला उपायुक्तांच्या नेतृत्वात राबविला जाणार आहे. ज्यामध्ये पोलीस उपायुक्त विनिता साहू, आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर आणि विशेष शाखेच्या उपायुक्त निर्मला देवी यांचा समावेश आहे. हे अभियान २६ ते ३० ऑगस्ट दरम्यान संपूर्ण शहरात राबवण्यात येणार असून यामध्ये शहरातील ९३८ शाळा आणि महाविद्यालये आहेत. या सर्वांना उपक्रमात सहभागी केले जाणार आहे. या जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून पोलीस आपल्या मदतीसाठी असल्याची भावना आणि विश्वास त्यांच्या मनात निर्माण करण्यावर जोर दिला जाणार आहे.