नागपूर - शहरात तरुण-तरुणींसह अनेकजण वाहतुकीचे नियम सर्रास मोडत सुसाट वेगाने गाडी चालवत असल्याचे चित्र आहे. गेल्या ७ महिन्यात एकट्या नागपुरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची संख्या इतर शहरांच्या तुलनेत जास्त आहे. वाहतूक विभागाने शहराच्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र, त्याचा फारसा फायदा न झाल्याचे चित्र पाहायला मिळते.
नागपुरात वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन, ७ महिन्यात ५० हजारापेक्षा अधिक जणांवर कारवाई शहराचे भौगोलिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक महत्त्व मोठे आहे. त्यामुळे येथे देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांचा वावर बघायला मिळतो. त्यामुळे शहरात वास्तव्य करणाऱ्या लोकांची संख्या देखील २५ लाखांच्या घरात पोहोचली आहे. सार्वजनिक परिवहनाच्या मुबलक सोयी उपलब्ध नसल्याने येथे राहणारे प्रत्येक नागरिक स्वतःची दुचाकी किंवा चारचाकी वाहनावरच अवलंबून आहेत. त्यामुळे वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांची संख्या देखील जास्त आहे.
गेल्या ७ महिन्याच्या कालावधीत एकट्या नागपूर शहरात हेल्मेट न घालता वाहन चालवणाऱ्या ३८ हजार ६९३ वाहनधारकांवर वाहतूक विभागाने कारवाई केली आहे. तसेच सिग्नल तोडल्यामुळे दंड झालेल्या वाहन चालकांची संख्या २७ हजार २८० आहे. याशिवाय दारू पिऊन गाडी चालवणे हा गुन्हा आहे. मात्र, हा गुन्हा करणाऱ्या १२ हजार ९२८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त ट्रिपल सीट, गाडी चालवताना मोबाईलचा वापर करणे आणि कार चालवताना सीट बेल्टचा वापर टाळणाऱ्यांवर देखील मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. मात्र, नागपूरकर वाहतुकीचे नियम का पाळत नाही? यावरच आता पोलीस विभागाला अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली आहे.
वाहतूक पोलीस कधी-कधी सिग्नलवर उपस्थित नसतात. त्यामुळे वाहनधारकांना वाहतुकीचे नियम मोडत सुसाट वेगाने गाडी पळवत असतात. यामध्ये तरुणाईची संख्या सर्वाधिक आहे. यामध्ये शिवाय अनेक ठिकाणी ना-दुरुस्थ आणि बंद पडलेले सिग्नलमुळे देखील वाहन चालक नियम तोडत असतात.