नागपूर -कोविड रुग्णांवर उपचार करताना शासनाने ठरवून दिलेल्या दरांपेक्षा जास्त दर आकारल्या प्रकरणी नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी यांनी सेव्हन स्टार आणि विवेका या दोन रुग्णालयांवर दंडात्मक कारवाई केली आहे. या दोन्ही रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या ७६ रुग्णांकडून २४ लाख रुपये परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महत्वाचे म्हणजे सेव्हन स्टार रुग्णालयावर या आधी सुद्धा दोन वेळा तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कारवाई केली होती.
विवेका आणि सेव्हन स्टार रुग्णालयावर कारवाई करण्याचे नागपूर मनपा आयुक्तांचे आदेश - नागपूर विवेका आणि सेव्हन स्टार रुग्णालय बातमी
शासनाने ठरवून दिलेल्या दरांपेक्षा जास्त दर आकारल्या प्रकरणी नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी यांनी सेवनस्टार आणि विवेका या दोन रुग्णालयांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील विविध खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोविड उपचारासंदर्भातील दर निश्चीत केले आहेत. या संदर्भांत सार्वजनिक आरोग्य विभागाने ३१ ऑगस्ट २०२० ला आदेश पारित केले. या आदेशानुसार नागपूर महानगरपालिकेव्दारे शहरातील विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णांची उपचारासंदर्भातील दर व पध्दती निश्चीत करण्यात आलेली आहे. शहरातील सर्व संबंधीत रुग्णालयांना शासन अधिसूचना आणि मनपाव्दारे निर्गमित आदेशांचे अनुपालन करणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र अनेक रुग्णालयांकडून रुग्णांची लूट सुरू असल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर मनपा आयुक्तांनी या तक्रारींची दखल घेण्यासाठी एक समिती गठीत केली होती.
ऑडिटमध्ये उघड झाले नियमबाह्य शुल्क
लेखा परीक्षकांनी रुग्णालयांनी उपचाराअंती रूग्णाला दिलेल्या बिलांचे ऑडिट केल्यानंतर दोन रुग्णालयांनी रुग्णांकडून अधिकचे पैसे घेतल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी दोन रुग्णालयांना जास्त दर आकारणी केल्या प्रकरणी नोटीस बजावल्या आहेत. तसेच त्यांना ७६ रुग्णांकडून वसूल केलेले अतिरिक्त २३ लाख ९६ हजार ०५० रुपये परत करण्याचे आदेश दिले आहे आहेत. या दोन हॉस्पीटलमध्ये सुभाषनगर येथील विवेका हॉस्पिटल आणि जगनाडे चौकातील सेव्हन स्टार रुग्णालय यांचा समावेश आहे. मनपा आयुक्त यांच्या मार्गदर्शनात साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ व इतर अनुषंगीक कायद्यान्वये दोन्ही रुग्णालयांवर कारवाई करण्यात आली आहे.