नागपूर- गेल्या काही दिवसांपासून म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढला आहे. या आजाराचे रुग्ण वाढत चालले असून यासाठी औषधे मिळणे कठीण झाले आहे. त्यातच या आजारावर उपचारासाठी आवश्यक असणारी औषधे महाग असल्याने सामान्य नागरिकाना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत गरिबांचा उपचार माफक दरात झाला पाहिजे, यासाठी जिल्ह्यात म्युकरमयकोसिस संदर्भात एक एसओपी तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिल्या आहेत. ते नागपूर येथे विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते.
म्युकरमायकोसिसने बाधित गरीब रुग्णांना स्वस्तात उपचार देण्यासाठी एसओपी तयार करा- डॉ. राऊत
म्युकरमायकोसिसवर प्रभावी ठरणारे 'एम्फोटेरेसिन-बी' हे औषध बनणारी एकच कंपनी मुंबईत आहे. यामुळे औषधांचा तुटवडा निर्माण होत आहे. वर्ध्यातील जेनेटिक लाईफ सायन्स कंपनीला या औषधाच्या निर्मितीची परवानगी मिळाली आहे. येत्या काही दिवसात या कंपनीकडून औषधांचा पुरवठा होऊन परिस्थिती लवकरच सुधारणा होईल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.
नागपूर जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णाचा दर कमी झाल्याने याचे सर्वात मोठे श्रेय नागपूरच्या जनतेचे आहे. यामध्ये विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, विभागीय संचालक संजय जायस्वाल, या सर्वांनी रात्रंदिवस अथक परिश्रम घेऊन यावर मात केली आहे.
संकट टळले नाही, लापरवाह होऊ नका-
कोरोनाचे रुग्ण कमी झाले पण संकट टळले नाही, तिसऱ्या लाटेचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. कोणीही निष्काळजीपणे वागू नये, नियमांचे पालन करावे, मास्क सामाजिक अंतर आणि सॅनिटाईज करून काळजी घ्या, असेही आवाहनही पालकमंत्री राऊत यांनी जनतेला केला आहे. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर हा पहिल्या लाटेप्रमाणे हळूहळू कमी होईल, अशीही आशाही त्यांनी व्यक्त केली.
प्रत्येक रुग्णालयात लहान मुलांसाठी वेगळा विभाग करण्याचा विचार-
तिसऱ्या लाटेत मृत्यूची भीती पाहता लहान मुलांसाठी प्रत्येक रुग्णलायत वेगळे सेक्शन निर्माण करण्याचा विचार सुरू आहे. तशा सूचनाही दिल्या आहेत. यासाठी टास्कफोर्स तयार करण्यात आले आहे. टास्कफोर्सच्या सूचना काय आहेत त्यानुसार काम केले जाईल, असेही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.