नागपूर -शहरातील दुहेरी हत्याकांडाचा प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. शंकर चंपाती आणि त्यांची पत्नी सीमा चंपाती यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्यांची दत्तक कन्या प्रियंका आणि तिचा प्रियकर इकलाखला अटक केली आहे. मात्र, आरोपी इकलाख हा आंतरराष्ट्रीय स्तरावर किक्रेट खेळलेला आहे. मात्र, त्याचे शिक्षण कमी असल्याने आणि तो जातीने मुस्लिम असल्याने त्यांच्या प्रेमाला विरोध होत होता. त्यामुळे त्यांनी चंपाती दाम्पत्यांची हत्या केल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. यापूर्वी सुद्धा २ वेळा चंपाती दाम्पत्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा खुलासाही झाला आहे.
कारवाईबद्दल माहिती देताना पोलीस अधिकारी प्रियंका ही केवळ ६ महिन्यांची असताना तिच्या मूळ आई -वडिलांचा एका अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर शंकर आणि सीमा चंपाती या दाम्पत्यानेच प्रियंकाचा सांभाळ केला. तिला उच्चशिक्षित केले. प्रियंका बारावीत असताना ९० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली होती, तर अभियांत्रिकीचे शिक्षण तिने ७५ टक्के गुण घेऊन पूर्ण केले आहे. अभ्यासात प्रचंड हुशार असलेली प्रियंका आयटी कंपनीत नोकरीला आहे.
प्रियंका ८ व्या वर्गात शिकत असताना शिकवणीच्या वर्गात इखलाक सोबत तिची ओळख झाली. ८ वी ते १२ वी पर्यंत दोघांमध्ये चांगली मैत्री होती. दरम्यानच्या काळात आरोपी इकलाख हा भारताच्या अंडर १३, १६ आणि १९ वयोगटातील संघाकडून क्रिकेट खेळला आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली असून तो झिम्बाब्वे येथे सुद्धा खेळायला गेला होता.
दरम्यान प्रियंका इंजिनिअर झाली, तर इकलाखने १२ वी पर्यंतचे शिक्षण घेतले. त्याच काळात प्रियंका आणि त्याच्यामध्ये प्रमेसंबंध निर्माण झाले. चंपाती दाम्पत्याला दोघांच्या प्रेमाची कुणकुण लागल्याने ते तिच्यावर लक्ष ठेवून होते. इकलाख हा कमी शिकलेला होता. तसेच तो मुस्लिम असल्याने प्रियंकाच्या आई-वडिलांना त्यांचे नाते मंजूर नव्हते. त्यामुळे चंपाती दाम्पत्याबद्दल प्रियंकाच्या मनात राग निर्माण झाला. त्यानंतर तिने तिच्या प्रियकराच्या मदतीने त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो फसला. अखेर त्यांनी त्यांचा डाव साधला आणि चंपाती दाम्पत्यांची हत्या केली.
आयटी प्रोफेशनल असलेल्या प्रियंकाने सर्व डिजिटल पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्वतःचे फेसबुक अकाउंट डिलीट केले, तर पोलिसांना आपल्यावर संशय येऊ नये याकरता त्यांनी वारंवार स्वतःचे लोकेशन सुद्धा बदलून पोलिसांना भ्रमित करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. दोघांनीही स्वतःचे कॉल रेकॉर्ड देखील डिलीट केले होते. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आणि आरोपीला अटक केली.