नागपूर- लूटमार, खंडणी, मारहाण, खूनासारख्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने संत्रा नगरी नागपुरला आता गुन्ह्याची राजधानी म्हणजेच क्राईम कॅपिटल , अशी नवी ओळख राज्यात होत आहे. याच जिल्ह्यातील नरखेडमध्ये आईसह चार वर्षीय मुलाची बत्त्याने ठेचून हत्या झाल्याची घटना घडली आहे. प्रियंका साहू आणि अंशुल साहू, अशी मृतांची नावे आहेत. घटनेनंतर साहू कुटुंबातील नोकर फरार असल्याने पोलिसांना त्याचावर संशय आहे.
नरखेड येथील स्वामी विवेकानंद चौकाजवळ हॉटेल व्यावसायिक दिनेश साहू हे आपल्या कुटुंबासह भाड्याने राहतात. दिनेश हे मूळचे बिहारचे रहिवाशी असून ते नरखेडमध्ये त्यांची पत्नी प्रियंका (वय २३ वर्षे) आणि अंशुल (वय ४ वर्षे) सोबत राहत होते. दिनेश यांचे ग्रामीण भागात भरणाऱ्या आठवडी बाजारात फिरते/अस्थायी हॉटेलचा व्यवसाय आहे. दिनेश साहू यांच्या हॉटेलच्या व्यवसायात मदत म्हणून बिहार येथील रवि नावाचा कामगार पंधरा दिवसांपूर्वी आला होता. तो दिनेश साहू यांच्या कुटुंबींयासोबतच नरखेड येथे राहत होता. काल (शनिवारी) संध्याकाळी दिनेश बाहेर गेले असता अज्ञात आरोपीने त्यांच्या पत्नी आणि मुलाची बत्त्याने ठेचून हत्या केली. सायंकाळी सातच्या सुमारास घरी गणपती असुनही साहू यांच्या घरी अंधार असल्याने शेजाऱ्यांना शंका आली. त्यानंतर शेजाऱ्यांनी पाहिले असता बेडरूममध्ये प्रियंका आणि अंशुलचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.