नागपूर : महाविकास आघाडीची दुसरी वज्रमुठ सभा नागपुरात 16 एप्रिलला आयोजित करण्यात आली आहे. या सभेला उद्धव ठाकरे स्वत: उपस्थित राहून विदर्भवासीयांशी संवाद साधणार आहेत. ही सभा गर्दीचा उच्चांक मोडणारी ठरेल असा दावा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. ते आज नागपूरात आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत होते. नागपूर येथील सभेची संपूर्ण जबाबदारी माजी मंत्री सुनील केदार यांच्याकडे देण्यात आली आहे. सेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सभेच्या तयारीला लागले आहेत. ही सभा यशस्वी होईल, असे ते यावेळी म्हणाले.
'आमदारांना शांत मारण्यासाठी अयोध्या दौरा' :राज्यातील अनेक भागात गारपीट व अवकाळी पाऊस झाला आहे. विदर्भातही यामुळे मोठे नुकसान झाले आहे. परंतु दुर्दैवाने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारला वेळ मिळाला नाही. अनेक आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे आमदारांना शांत मारण्यासाठी अयोध्या दौरा करण्यात आला. राज्यात काही ठिकाणी शेतात बांधावर जाण्याचे नाटक करण्यात आले. पण त्याने काहीच फरक पडणार नाही, असे विनायक राऊत यावेळी म्हणाले. राज्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढतो आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सरकारचे नियोजन दिसून येत नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
'सभा नियोजित ठिकाणीच होणार' :खासदार विनायक राऊत पुढे बोलताना म्हणाले की,'नागपूरच्या सभेपुर्वी काही जणांना पोटशूळ उठली आहे. वज्रमुठ सभेला अडचणी कशा निर्माण करता येतील यासाठी काहीजण कामाला लागले आहेत. मात्र कितीही प्रयत्न केले तरी ही सभा ठरलेल्या ठिकाणीच होणार आहे. महाविकास आघाडीची दुसरी वज्रमुठ सभा 16 एप्रिलला नागपूर येथील दर्शन कॉलनीच्या मैदानावर होणार आहे.