नागपूर- मुंबईत खासगी लॅबमध्येही कोरोनाची टेस्ट करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नागपुरातही खासगी प्रयोगशाळेत कोरोना रुग्णांच्या स्वॅबची चाचणी करण्यासाठी परवानगी का दिली जात नाही? असा प्रश्न राज्यसभा खासदार डॉक्टर विकास महात्मे यांनी उपस्थित केला. राजधानी मुंबई प्रमाणेच उपराजधानी नागपुरात सुद्धा कोरोनाबाधितांची संख्या वाढीस लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर तरी या मागणीकडे गांभीर्याने बघण्याची गरज असल्याचे मत डॉक्टर महात्मे यांनी व्यक्त केले.
'नागपुरातील खासगी प्रयोगशाळांना कोरोना टेस्ट करण्याची परवानगी द्या' - मेयो मेडिकल
सध्या नागपुरातील मेयो, मेडिकल, इतर दोन प्रयोगशाळेत कोरोनाचे नमुने तपासले जातात. सध्या या प्रयोगशाळांवर कोरोना विषाणू संबंधित परीक्षण करण्याचा मोठा ताण आहे. इथे विदर्भासह अन्य ठिकाणच्या कोरोना रुग्णांचे नमुने तपासणीकरिता येतात. त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात कोविड-१९ चाचण्या होत नाहीत.
सध्या नागपुरातील मेयो, मेडिकल, इतर दोन प्रयोगशाळेत कोरोनाचे नमुने तपासले जातात. सध्या या प्रयोगशाळांवर कोरोना विषाणू संबंधित परीक्षण करण्याचा मोठा ताण आहे. इथे विदर्भासह अन्य ठिकाणच्या कोरोना रुग्णांचे नमुने तपासणीकरिता येतात. त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात कोविड-१९ चाचण्या होत नाहीत. म्हणूनच कोरोना टेस्टची गती वाढवण्यासाठी सरकारने खासगी प्रयोगशाळेत कोरोना चाचणी करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राज्यसभा खासदार विकास महात्मे यांनी केली.
महात्मे म्हणाले, सध्या केवळ रुग्णालयात दाखल असलेले किंवा संशयित रुग्णांच्याच स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात. मात्र, कोरोना बाधित रुग्णांना खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची मंजुरी नाही. परिणामी जिल्ह्यात फार कमी प्रमाणात कोरोनाच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. त्यातही कोरोनाबाधित रुग्णांवर केवळ मेयो, मेडिकलमध्येच उपचाराची सोय आहे. मात्र, या रुग्णालयांमध्ये जाण्याला रुग्ण घाबरतात. त्यामुळे खासगी रुग्णालयांनाही उपचार करण्याची परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. शासन आणि प्रशासनाने हे निर्बंध शिथिल केल्यास याचा फायदा संशयित रुग्णांना होऊ शकतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.