नागपूर- जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी लागणारे साहित्य खरेदी करून डीबीटी तत्वावर पैसे दिले जात. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांनी केला आहे. याबाबत जिल्हा कृषी अधीक्षक नलिनी भोयर यांच्याकडे जाऊन जाब विचारला. शेतकरी गटाची अशा पद्धतीने फसवणूक होत असल्याने संतापही व्यक्त केला.
डीबीटी योजनेला फाटा का दिला..?
राज्य सरकारच्या आत्मा या प्रकल्पा अंतर्गत 90 टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना शेतीसाठीचे साहित्य देण्याची योजना आहे. या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी 90 टक्के सबसिडीचे पैसे हे डीबीटीच्या माध्यमातून दिले जातात. पण, कृषी विभागाकडून जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रस्ताव मंजूर करत साहित्य खरेदी करण्यात आले. यामध्ये खरेदी करण्यात आलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे असून बाजारात मिळणाऱ्या किंमतीपेक्षा जास्त किंमतीत हे विभागाच्यामार्फत शेतकरी गटांना जबरदस्तीने सह्या करून दिले जात होते, अशी तक्रार आमदार जयस्वाल यांच्याकडे काही शेतकऱ्यांनी केली होती.
जिल्हा कृषी अधीक्षकांना विचारला जाब
यासंदर्भात काही शेतकऱ्यांनी आमदार आशिष जयस्वाल यांच्याकडे तक्रार केली होती. यावेळी त्यांनी हा भ्रष्टाचार होत असल्याचे लक्षात येताच अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी हे निकृष्ट कृषी साहित्य घेऊन चक्क जिल्हा कृषी अधीक्षक यांची भेट घेतली. यात शेतकऱ्यांना बाजारातून, वाटेल त्या दुकानातून पाहिजे ते साहित्य विकत घेण्याची मुभा आहे. पण, काहींनी संगनमत करून दोन कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात साहित्य खरेदी करून भ्रष्टाचार केल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक नलिनी भोयर यांना सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत शेतकरीही उपस्थित होते.