नागपूर - शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी मदत जमा होईल, असा शब्द आमच्या सरकारने दिला होता. त्यानुसार २ हजार २९७ कोटी ६ लाख रुपयांची मदत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. उर्वरित मदत ही दिवाळी नंतर दिली जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मदतीची रक्कम शेतकऱ्यांना वितरित केल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
आश्वासन पाळले -
गेल्या महिन्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. सरकार म्हणून आम्ही तत्काळ पंचनामे करून शेतकऱयांसाठी दहा हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र, प्रत्यक्षात मदत मिळायला उशीर होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. त्यानंतर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असे आश्वासन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले होते. त्यानुसार आज राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून २ हजार २९७ कोटी रुपयांचा पहिला हफ्ता संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.