नागपूर - यंदाचे पहिले सूर्यग्रहण २१ जूनला दिसणार आहे. हे पहिलेच ग्रहण असल्याने त्याचे महत्त्व आहे. कंकणाकृती सूर्यग्रहण जेष्ठ महिन्यात आले असल्याने ज्येष्ठ मंडळींना त्रास सहन करावा लागेल, तर सात्विक प्रवृत्तीच्या लोकांसाठी देखील क्लेशदायक ठरणार आहे. मिथून राशीत चंद्रमा असल्याने वृषभ, मिथून आणि कर्क राशीच्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागेल, तर मेष, सिंह आणि कन्या राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण फायद्याचे ठरणार असल्याचे ज्योतिष अभ्यासक मिलिंद केकरे यांनी सांगितले.
कंकणाकृती सूर्यग्रहण असल्याने ते भारतातून पाहायला मिळणार आहे. सकाळी १० वाजून १२ मिनिटे ते दुपारी १ वाजून ४४ मिनिटे इतका सूर्यग्रहणाचा कालावधी असेल. साधारण ३ तास ३२ मिनिटे सूर्यग्रहण असणार आहे. सूर्यग्रहण म्हणजे खगोलीय घटना आहे. चंद्र पृथ्वीपासून सर्वाधिक अंतरावर असतो, तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहणामध्ये सूर्य एखाद्या अंगठी सारखा दिसतो. ज्या भागात चंद्रामुळे सूर्य झाकला जातो. खगोलशास्त्रात सूर्यग्रहणाला अनन्य साधारण महत्व असते. त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रात सुद्धा सूर्यग्रहणाला विशेष महत्व प्राप्त असल्याचे ज्योतिष अभ्यासक मिलिंद केकरे यांनी सांगितले.