नागपूर Maratha Quota Violence :जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी या गावात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. हा लाठीचार्ज राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानं करण्यात आल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh) यांनी केला आहे. गुरुवारी नागपूर येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा हल्लाबोल केला आहे.
अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा हल्लाबोल अधिकाऱ्यांना ठरवलं जात आहे दोषी : लाठीचार्ज करण्याचे आदेश देणाऱ्यांना सोडून पोलीस अधिकाऱ्यांना दोषी ठरवलं जात असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. गृह मंत्रालयातून लाठीचार्ज करण्याचा कोणताही आदेश देण्यात आलेला नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. मात्र मी देखील माजी गृहमंत्री आहे, माझे सुद्धा काही सोर्स आहेत. लाठीचार्जचा आदेश देवेंद्र फडणवीस यांनीच दिल्याचं अनिल देशमुख यांनी यावेळी पुन्हा ठणकावलं.
तिढा सोडवण्यास शरद पवारांचं अनुकरण करा : मराठा आरक्षणाचा हा तिढा सोडवायचा असेल, तर शरद पवार यांनी जो मार्ग सुचवलेला आहे, त्याचं अनुकरण करावं लागेल असं अनिल देशमुख म्हणाले. मराठा समाजाच्या आरक्षणाची सोय करत असताना ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी असंही अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितलं.
अजित पवारांवर आरोप केले नाहीत : मराठा समाजाच्या उपोषणकर्त्यांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश हे मंत्रालयातून देण्यात आले होते, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला होता. अजित पवार यांनी अनिल देशमुखांना आव्हान देत हे सिद्ध केल्यास राजकारण सोडेल, असा दमच दिला होता. यावर अनिल देशमुख यांना विचारलं असता, मी अजित पवार यांच्यावर आरोप केलेलेच नाहीत, तर गृहमंत्र्यांवर माझे आरोप असल्याचं अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा :
- Maharashtra Political Crisis: अनेक आमदारांना परत यायचे आहे; दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल - आ. अनिल देशमुख
- Anil Deshmukh News: निवडणुका तोंडावर असल्या की मोठ्या दंगली घडवून त्याचा राजकीय फायदा घेतला जातो- अनिल देशमुख