नागपूर :उद्धव ठाकरे यांनी सोमवारी नागपूरमधील सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलताना सडकून टीका केली होती. देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे कलंक असल्याचे ते म्हणाले होते. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले आहेत, उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल केलेले वक्तव्य निंदनीय आहे. राजकारणात भाषेचा स्तर राखायला हवा. आम्ही सरकारमध्ये असताना केलेले विकासकार्य आणि त्यांनी केलेले कार्य यावर त्यांनी जरूर चर्चा करावी, परंतु अशा पद्धतीने अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन व्यक्तिगत आरोप करणे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही.
ट्विटच्या माध्यमातून सवाल : भाजपाचे नेते चंद्रकांत बावनकुळे यांनी देखील उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी सवाल विचारला आहे. उद्धव ठाकरे म्हणजे हिंदुत्वाला आणि महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. जो स्वतःच्या वडिलांच्या विचारांचा पाईक होऊ शकला नाही तो, काय महाराष्ट्राच्या गप्पा मारणार आहे. तुम्ही किती कर्तृत्वशून्य आहात, हे देखील तुमच्या सत्तेच्या अडीच वर्षांत लोकांनी अनुभवले आहे. उद्धव ठाकरे तुम्ही २०१९ साली गद्दारी करून सत्ता मिळवली. सत्तेच्या अडीच वर्षांत तुम्ही घरात बसून फुकाच्या गप्पा मारत तुम्ही १०० कोटींची वसुली केली. महाराष्ट्र कलंकित केला. त्यामुळे महाराष्ट्राला लागलेला खरा कलंक म्हणजे उद्धव ठाकरे आहेत, असे ट्विट बावनकुळे यांनी केले आहे.