नागपूर Maharashtra Assembly Winter Session 2023 :विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात विदर्भवादी समर्थक आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी पत्रकार प्रकाश पोहरे यांनी शेतकरी आणि विदर्भाच्या समस्या मांडण्यासाठी गॅलरीत घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीचे पडसाद विधानभवनाच्या सदनातही उमटले. तालिका अध्यक्ष असलेले आमदार चेतन तुपे यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी हा मुद्दा उपस्थित करुन लोकसभेत 13 डिसेंबरला झालेल्या हल्ल्याचा संदर्भ दिला. त्यामुळं या प्रकरणी अध्यक्षांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहे.
गॅलरीत प्रचंड घोषणाबाजी :नागपूर हिवाळी अधिवेशन हे विदर्भातील प्रश्नांसाठी घेण्यात येते. मात्र नागपूर अधिवेशनात विदर्भाच्या आणि पूर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर कोणीच बोलत नसल्याचा आरोप प्रकाश पोहरे यांनी केला. गेल्या 7 डिसेंबरपासून नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मात्र या अधिवेशनात विदर्भ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात येत नाही. ही चर्चा फक्त मराठा आरक्षणावरच सुरू आहे. मराठा आरक्षणावरुन आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. मात्र विदर्भातील शेतकरी आणि त्यांच्या आत्महत्यांविषयी या अधिवेशनात अद्यापही चर्चा करण्यात आली नसल्याचा आरोप पोहरे यांनी केला.
शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून इथं आलो :विदर्भातील आमदार विदर्भातील शेतकरी आणि त्यांच्या आत्महत्येवर सदनात बोलत नाहीत. विदर्भातील शेतकरी आत्महत्या वाढल्या असूनही त्यांच्या समस्या कोणताही प्रतिनिधी मांडत नसल्याचा आरोप प्रकाश पोहरे यांनी केला. त्यामुळं मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून इथं आलो आहे, असही त्यांनी यावेळी सांगितलं.